Sunday, 27 June 2021

लोकमाता अहिल्यामाता होळकर



     जगातील एक उत्तम शासन कर्ती  म्हणून नावलौकिक मिळविलेल्या अहिल्यामाता होळकर यांची 31 मे रोजी जयंती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही जयंती कौटुंबिक स्तरावर किंवा ऑनलाइन पद्धतीने साजरी केली जात आहे. गेल्या दीड वर्षापासून जगभर कोरोनाने सर्वच स्तरावर अस्थिरता निर्माण केलेली आहे. आज माणसापुढे अनेक संकटे,  आव्हाने उभी आहेत. महामानवांची जयंती साजरी करत असताना आपण त्यांचा इतिहास, कार्यकर्तृत्व त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यांनी दिलेला लढा यांना जर उजाळा देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या इतिहासातून पाठ व प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपला भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठीच्या प्रेरणा नक्कीच मिळतील,  संकटांना,  आव्हानांना पेलण्याचे बळ नक्की  मिळेल. 

         अहिल्यमातानी आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटावर मात केली  ती त्यांच्यातील असलेल्या गुणांच्या जोरावर. त्या विज्ञाननिष्ठ, धाडशी,  पुरोगामी विचारसरणीच्या,  चिकित्सक,  प्रयत्नवादी होत्या. उत्तम प्रशासक असणाऱ्या अहिल्यामातांनी लोककल्याणकारी राज्य केले. आपला राजदंड आयुष्यभर शोषणाच्या विरोधात आणि शोषितांच्या बाजूने वापरलेला आहे.

      त्यांचा जन्म 31मे 1725 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील,  जामखेड तालुक्यातील, सीना नदीच्या काठावरील चौंडी या गावी झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव सुशिलाबाई तर पिताश्रींचे नाव माणकोजी शिंदे. चौंडी गावच्या पाटीलकीचा  मान माणकोजी यांच्याकडे होता. ते गावचा कारभार अत्यंत उत्तम पणे सांभाळत होते. युद्ध कलेत पारंगत असलेले माणकोजी यांना शेतीची ही  उत्तम जाण होती. त्यांची सहा अपत्ये,  पैकी पाच मुले व एक मुलगी अहिल्या.

    त्यांनी मुलगा -मुलगी हा भेदभाव न करता मुलांच्या बरोबरीने  मुलगीला ही शिक्षण दिले होते. तिला लिहिता-वाचता येत होते. शिवाय युद्धशास्त्रात ही पारंगत केले होते. त्यामुळे अहिल्यामातामध्ये प्रचंड धाडस व आत्मविश्वास निर्माण झाला होता.

       20मे 1733 मध्ये त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी पुणे येथे झाला. विवाहानंतर त्या इंदौरला आल्या. त्यांच्या सासुबाई गौतमा बाई अत्यंत हुशार,  धाडशी,  धैर्यवान व युद्धशास्त्र पारंगत होत्या. इंदौरचा राज्यकारभार त्या पहात होत्या. नऊ वर्षांच्या अहिल्यामाता राज्यकारभार सांभाळण्यात गौतमाबाईंना मदत करू लागल्या.

     मल्हारराव होळकर त्यांना राज्यकारभाराचे धडे देत असत. सासरे व पती यांच्याबरोबर त्या अनेक वेळा युद्धावर गेलेल्या आहेत. सासू, सासरे व पती यांनी अहिल्यामाता ना परिपूर्ण शिक्षण दिले होते. इतिहास, वेद, पुराण यांचे वाचन, सत्य शोधण्याचा प्रयत्न,  यावर त्यांनी चिंतन मनन करून सत्य स्वीकारले होते.

    सासू, सासरे,  पती, मुलगा,  नातू अशा जवळच्या नातेवाइकांच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला सावरत त्यांनी आपल्या प्रजेला संतती मानत आयुष्यभर त्यांच्या सुखासाठी, आनंदासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्या काळी त्या जगातील सर्वश्रेष्ठ महाराणी  ठरलेल्या आहेत.

     मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे स्वतःच्या खाजगी मालकीची मोठी संपत्ती  होती . तो सर्व पैसा त्यांनी जनतेच्या सुख सोयीसाठी,  लोककल्याणासाठी वापरला. अहिल्यामातांनी स्वतः योजना आखल्या,  आराखडा तयार केला. रस्ते,  धर्मशाळा बांधल्या,  पिण्याच्या पाण्याची सोय केली. घाट बांधले, अन्नछत्रे उघडली वृक्षारोपण केले. भारतात जवळजवळ साडेतीन हजार ठिकाणी त्यांनी ही कामे केलेली आहेत. महेश्वरी येथे कपड्यांचा उद्योग उभा केला. कारागिरांना,  कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला.

    स्त्रिया व शेतकरी यांच्या हक्क अधिकारासाठी त्यांनी अनेक धोरणे राबवली होती.

     त्यांच्या राज्यात ताबडतोब व वेळेत न्याय देण्याची व्यवस्था असल्यामुळे,  तुरुंग निर्माण करण्याची गरजच नव्हती. लोकमाता जगातील एक आदर्श राज्यकर्ती  स्त्री ठरल्या. त्यांच्या कार्याला व कर्तुत्वाला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    --- डॉ. निर्मला पाटील. सांगली.(9822725678).

     31/05/2021.

No comments:

Post a Comment