🚩 *क्रांतिसिंह* *_नाना_* *_पाटील_*: *_एक_* *_क्रांतीपर्व_* 🚩🚩
परिवर्तनाची प्रक्रिया हजारो वर्षापासून सुरूच आहे. अनेक महामानवांनी या प्रक्रियेतील प्रवाहाला, प्रवासाला गती देण्याचे महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. हा इतिहास आजही आम्हाला प्रेरणा देणारा, अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यास बळ देणारा आहे.
या प्रवाहातील असे अनेक महानायक आहेत की त्यांचा इतिहास सोनेरी पानावर लिहिला जाणे आवश्यक होते, पण त्यांच्या कार्याची, संघर्षाची, त्यागाची साधी दखल सुद्धा साहित्यिकांनी, इतिहासकारांनी घेतलेली नाही. या इतिहासामुळे अनेक सामाजिक सुधारणा घडून आल्या असत्या. नवीन पिढी सुसंस्कारित झाली असती. असा देदीप्यमान इतिहास मातीत घातला आणि शून्य कार्यकर्तृत्व असणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना महानायक म्हणून पुढे आणले आणि समाजाला गुलाम, दिशाहीन करण्याचा प्रचंड मोठा हा अक्षम्य अपराध बऱ्याच साहित्यिकांनी आणि इतिहासकारांनी केलेला आहे.
3 ऑगस्ट 1900 या दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका महानायकाचा जन्म झाला, त्यांचे नाव नाना पाटील. क्रांतिसिंहाचा कार्यकाळ अगदी विस्मृतीत जाण्याइतकाही दूरचा नाही तरीही त्यांनी केलेल्या कामाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. प्रत्येक व्यक्तीच्या जीभेवर नानांचा प्रेरणादायी इतिहास असायला हवा होता पण अपवाद वगळता नानांच्या इतिहासाचे फारसे स्मरण कोणाला नाही.
नानांचे विचार आणि त्यांनी केलेले काम आजच्याही काळात समजून घेऊन कृती करण्यासारखे आहे त्यांच्या आयुष्यातील काही घटना समजून घेणे आवश्यक आहे जेणेकरून आजच्या काही सामाजिक समस्या सुटू शकतील.
सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र हे नानांचे गाव. इतर गावाप्रमाणेच हे सुद्धा अठरापगड जाती धर्माच्या समूहांनी बनलेले. शिक्षणापासून थोडे दूरच असल्यामुळे अज्ञान, गरिबी, अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी परंपरा या माध्यमातून सर्वच बाजूंनी शोषण होत असलेले. यातून निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देत गावकरी जीवन जगत होते. नानांकडे सुपीक जमीन असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बरी होती. शेतीची कामे करीत करीत नानांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. कुस्तीची सुद्धा आवड त्यांच्यात या वयात निर्माण झाली होती. शिक्षणाच्या जोरावर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली. सत्यशोधकी जलसे आणि छत्रपती मेळाव्यांना नाना जावू लागले. यातून होणाऱ्या प्रबोधनामुळे नाना प्रभावित होऊ लागले आणि एक दिवस त्यांनी आपल्या नोकरीचा, सर्व सुखांचा त्याग केला आणि ते स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरले.
त्यांच्यावर शिवचरित्राचा व महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रचंड मोठा प्रभाव होता. त्यांचा त्यांनी अभ्यास, मनन, चिंतन करून ते विचार कृतीत आणल्याचे दिसून येते. अज्ञान, गरिबी, अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी-परंपरा, गुलामगिरी, शोषण, वर्णद्वेष या बाबींच्या विरोधात त्यांचा लढा कायम राहिलेला आहे. नाना नेहमी सांगायचे की, विवाहासारख्या समारंभासाठी कर्ज काढू नका. हुंडा देऊ नका, घेऊ नका, खोट्या प्रतिष्ठा मान पान यासाठी पैसा खर्च करू नका, तर मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करा. प्रसंगी कर्ज काढा पण मुलांना शिक्षण द्या. सत्यशोधकी पद्धतीचे अनेक विवाह नानांच्या प्रयत्नामुळे घडून आले. त्यांनी स्वतःचा विवाह सत्यशोधक पद्धतीने केला. पण स्वतःच्या विवाहात त्यांनी स्वतः मंगलाष्टके म्हटली व कोणत्याही भटजी शिवाय हा विवाह पार पडला. ही एक अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक घटना होती पण या घटनेची दखल इतिहासात फारशी घेतली गेली नाही.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा खरा वारसदार शिक्षणाचे महत्त्व अचूक ओळखू शकतो. नानांच्या पत्नी आकुबाई या दुधोंडी जिल्हा सांगली गावातील, नलवडे घराण्यातील होत्या. त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते. नानांनी त्यांना साक्षर करण्याचे ठरवले पण घरची मंडळी त्याला विरोध करू लागली. या वेळी नानांनी आपला निर्णय जाहीर करून टाकला, जोपर्यंत आकुबाईना लिहिता वाचता येणार नाही तोपर्यंत मी त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार करणार नाही आणि त्यांचा शब्द ही त्यांनी पाळला. त्यांना लिहायला वाचायला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नी म्हणून स्वीकार केला. आज परिस्थिती बदललेली आहे. अपवाद वगळता सर्वच महिला शिक्षित आहेत पण अपवादानेच सुशिक्षित आहेत, विज्ञान निष्ठ आहेत. अशा कुटुंबातील महिला सुशिक्षित, विज्ञाननिष्ठ झाल्या पाहिजेत यासाठी त्या कुटुंबातील इतर सदस्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तरच प्रत्येक कुटुंब सुखी समृद्धी आणि भयमुक्त होईल.
1940 च्या दरम्यान स्वातंत्र्यलढ्याची चळवळ बाळसे धरू लागली. आणि एक दिवस नानांनी आपले घर, गाव सोडले ते कायमचे. सातारा मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात भाषण करून वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली. या कारणाने त्यांना अटक झाली. एक वर्ष तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली. खरंतर नानांचे घराणे वारकरी संप्रदायाचे होते. नानांच्या वयाच्या बाराव्या दिवशी त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली गेली, ते वारकरी झाले. पण हा वारकरी पंढरपूरला कमी आणि स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जास्त वेळा वाऱ्या करणारा ठरला. 1932 ते 1942 या काळात नानांच्या तुरुंगात आठ वेळा वाऱ्या झाल्या.
स्वातंत्र्य चळवळीत काम करीत असताना नानांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याची संकल्पना होती आणि यातूनच त्यांना प्रतिसरकारची संकल्पना सुचली. इंग्रजांनी संपूर्ण भारतभर राज्य प्रस्थापित केले पण प्रतिसरकार मुळे साताऱ्यात त्यांना आपले राज्य प्रस्थापित करता आले नाही. इंग्रज अधिकाऱ्यांना, पोलिसांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. नानांचा त्यांनी धसकाच घेतला होता. प्रतिसरकारच्या माध्यमातून शिवराज्य उभं करण्याचा नानांचा प्रयत्न होता. दुर्लक्षित उपेक्षित लोकांना न्याय मिळवून देणे, भूमिहीनांना जमीन देणे, सावकारकी नष्ट करणे, स्त्रियांना हक्क अधिकार मिळवून देणे अशी अनेक कामे प्रतीसरकारने केलेली आहेत. यामुळेच नाना लोकांचा प्रचंड विश्वास आणि पाठिंबा मिळवू शकले.
त्यांचे संघटन कौशल्य जबरदस्त होते. आवाज भारदस्त होता आणि संभाषण कौशल्य ही खूप छान होते. त्यांनी वेळोवेळी शिवतंत्राचा वापर ब्रिटिश सत्ता खिळखिळी करण्यासाठी व स्वराज्य उभे करण्यासाठी केलेला दिसून येतो. नाना नेहमी म्हणत की नाना नेहमी म्हणत की साताऱ्यातील प्रतिसरकार उभे करण्यापाठीमागे आम्हाला शिवचरित्रातून प्रेरणा मिळालेल्या आहेत. 26 मे 1946 ला मुंबई येथे नाना पाटील यांच्या कार्याची दखल घेत प्रचंड जनसमुदायाने त्यांना *क्रांतिसिंह* या उपाधीने सन्मानित केले.
नाना अहिंसावाद मानणारे होते. पण त्याबरोबरच त्यांनी दरोडेखोरांचा निप्पात करण्याचा मोहिमेतही सक्रिय सहभाग घेतला होता. प्रसंगी नाठाळाचे माथी काठी मारण्याचे ही काम त्यांनी केलेले आहे. तुफान सेनेचा जन्मही काट्याने काटा काढण्याच्या उद्देशाने झाला. ब्रिटिशांची दडपशाही व स्थानिक गुंडांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी त्यांनी प्रसंगानुरूप अनेक तंत्रांचा वापर केला व दरोडेखोरांचा निप्पाद करण्यासाठी तुफान सेना कार्य करू लागली. नानांनी त्याची सूत्रे कुंडल गावचे सुपुत्र आदरणीय जी. डी. बापू लाड यांच्याकडे सोपविली. ही एक प्रशिक्षित कार्यकर्त्यांची सेना होती. गावागावातून तरुण कार्यकर्ते शोधून त्यांना प्रशिक्षित करून तुफान सेनेला पुरवण्याचे कार्य सेवादल करीत होते. त्याचे केंद्र कुंडल ला होते. अनेक कार्यकर्त्यातून या प्रशिक्षणासाठी काही कार्यकर्त्यांची निवड केली जात असे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना गावच्या रक्षणाची जबाबदारी दिली जात असे. गावच्या संरक्षणाबरोबरच रचनात्मक कार्य ही प्रशिक्षणार्थी करत असत. दारूबंदी, हुंडाबंदी, स्वच्छता साक्षरता प्रसार, कर्ज निवारण, क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे, रक्षण करणे, त्यांच्या अडचणी सोडवणे अशा प्रकारची कार्यही ते करीत असत.आजची सामाजिक स्थिती पाहता अशा प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज प्रत्येक गावाला आहे असे वाटते. समाजासमोर आज अनेक समस्या, आव्हाने आहेत जर प्रत्येक गावात प्रशिक्षित कार्यकर्ते असतील तर निश्चित ही एक दिलासा देणारी बाब ठरेल. गावकऱ्यांच्या अडचणी सोडवून जागतिकीकरणाच्या प्रवाहात आणण्याचे काम निश्चित असे प्रशिक्षित कार्यकर्ते करू शकतील.
नानांचा स्वभाव जितका हळवा होता तितकाच अन्यायाविरोधात कठोर होत होता. सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल, शोषण, त्यांची गरिबी अज्ञान पाहून त्यांना त्याचा कळवळा येत असे आणि ते अन्यायाविरोधात पेटून उठत. स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रवासाच्या दरम्यान नानांच्या पत्नी आकुबाई यांचे निधन झाले. एका वर्षात वडिलांचे निधन झाले. पुढे तीन महिन्यात धाकट्या भावजयीचे निधन झाले. असे अनेक आघात झाले तरी नानांनी आपला प्रवास थांबविला नाही किंवा त्याची दिशाही बदलली नाही.
समाजाचा विकास सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने नानांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. गरीब, वंचित, उपेक्षित, कष्टकरी, शेतकरी यांचे राज्य आणण्यासाठी, त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी राजकीय क्षेत्रात ते उतरले. पण हा सर्व त्यांचा भाबडा आशावाद ठरला. खरंच आम्ही स्वतंत्र झालो आहोत का? हा त्यावेळी नानांना पडलेला प्रश्न आजही आमच्या पुढे आहेत. राज्यकर्ते फक्त बदलले पण परिस्थिती बदलली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही नानांचे अंतकरण दुःखी होते. आजही सामाजिक स्थिती फारशी बदललेली नाही. काही नवीन प्रश्न, आव्हाने आमच्यापुढे नव्याने निर्माण झालेली आहेत. आम्ही यामध्ये बदल, परिवर्तन घडवून आणू शकतो. फक्त त्यासाठी गरज आहे ती महामानवांच्या विचारावर आचरण करणाऱ्या त्यांच्या अनुयायांची. त्यांच्या इतिहासाचा कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करून चिंतन करून कालसुसंगत आचरण करणाऱ्या कृतिशील वारसदारांची.
तीन ऑगस्ट क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जयंतीदिन तर 6 डिसेंबर 1976 त्यांचा मृत्यू दिन. *क्रांतिसिंह* *नाना* *पाटील* नावाचे परिवर्तनाच्या प्रक्रियेतील खूप मोठे वादळ आजही ते विचारांच्या रूपाने आमच्या सभोवती फिरत आहे. गरज आहे फक्त ते वादळ डोक्यात, मेंदूत आणि मनात पेलण्याचे . नानांच्या जयंतीदिनी त्यांचे काही विचार तरी कृतीत आणण्याचा आपण संकल्प करू या.
जय जिजाऊ जय शिवराय.
-- ✒️डॉ. निर्मला पाटील. (प्रदेशाध्यक्ष, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र.)
(03/07/2021) सांगली.
No comments:
Post a Comment