🚩🚩 *स्वराज्य* *प्रेरिका* - *राष्ट्रमाता* *राजमाता* *जिजाऊ* *साहेब* 🚩🚩
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे 12 जानेवारी 1598 ला झाला व 17 जून 16 74 ला त्यांचे निधन रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे झाले. एक धगधगती ज्योत शांत झाली. जिजाऊच नसत्या तर छत्रपती शिवराय घडले नसते आणि महाराष्ट्राचा, देशाचा इतिहास काही वेगळाच असता. रयतेवर होणारे अन्याय, अत्याचार, शोषण, गुलामी याची चीड आणि आपलीच माणसं वेगवेगळ्या परकीय राजांच्यासाठी लढताना मारली गेल्याच दुःख यातूनच शहाजीराजांच्या मनात स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे विचार येऊ लागले आणि त्यांनी तसे प्रयत्नही केले पण या प्रयत्नांना त्यांना यश आले नाही. हेच बीज त्यांनी जिजाऊंच्या मनात पेरले ते रुजले, अंकुरले, बहरले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने.
स्वराज्यस्थापनेचे आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य खर्ची घातले. अनेक तडजोडी, त्याग, संकटे, संघर्ष यांनी त्यांचे आयुष्य व्यापलेले आहे. स्वराज्याच्या निर्मितीसाठी जणूकाही त्यांचा जन्म झालेला होता. शिवराज्याभिषेकानंतर अवघ्या बाराव्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिजाऊंनी इतके अचाट धाडस प्रयत्न केले ते केवळ त्यांच्यावर झालेल्या संस्काराच्या व मिळालेल्या शिक्षणाच्या जोरावर. मनुस्मृतीने लादलेली शिक्षणबंदी झुगारून त्यांच्या मातोश्री म्हाळसाबाई राणीसाहेब व पिता लखुजीराजे यांनी त्यांना उच्च शिक्षण दिले. वयाच्या दहाव्या वर्षी त्या चार शास्त्रात (भाषाशास्त्र, युद्धशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र )व सहा भाषा (मराठी, हिंदी, कन्नड, अरबी, फारसी, उर्दू )मध्ये पारंगत झाल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हाळसारानींनी त्यांना त्यांच्या पूर्वजांचा जाज्वल्य इतिहास वारंवार सांगितलेला होता. या सर्व शिक्षणामुळे त्या धाडसी, चिकित्सक, विज्ञाननिष्ठ, अंधश्रद्धेतून -कालबाह्य रूढी-परंपरा तून मुक्त झाल्या होत्या. आणि याच शिक्षणाचा उपयोग त्यांना शिवरायांना घडविताना झाला.
मनुस्मृतीचे अनेक कायदे त्यांनी झुगारले. धार्मिक दहशतवादाला लाथ मारून शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. त्यांना माणूस म्हणून जगायला शिकविले. जमिनी, बी-बियाणे, बैलजोड्या, शेती अवजारे दिली. आंबावडी, पुनवडी सारखी धरणे पुणे येथे बांधली. भूविकास बँकेची संकल्पना ही जिजाऊंची होती.
परकीय राजांची आक्रमणे सातत्याने होत असत. रयत त्रासून गेलेली होती .या त्रासातून मुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांच्या हातात तलवारी दिल्या आणि त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरित केले, प्रशिक्षित केले.
शिवबाना स्वराज्य संस्थापक म्हणून घडविण्याची मोठी जबाबदारी जिजाऊनी पार पाडली. शहाजीराजे बराच काळ इतर शाह्यांच्या कामगिरीवर असत पण त्यांचे संपूर्ण सहकार्य, मार्गदर्शन, सल्ले जिजाऊंना योग्य वेळी मिळत असे. जिजाऊंना जे संस्कार, शिक्षण, अनुभव मिळाले आणि दोन्ही कुळांचा ज्वलंत इतिहासाचा वारसा मिळाला याच्या जोरावर त्या शिवरायांची जडणघडण करू लागल्या. जिजाऊंना मुलांच्या मानसशास्त्राची चांगली जाण होती. त्यांनी नेहमी स्वराज्य स्थापना व स्वराज्य संस्थापक या ध्येयावर शिवाजीराजांचे लक्ष केंद्रित केले. त्यांना प्रेरित केले, प्रशिक्षित केले. शिवरायांच्या मनात स्वातंत्र्य, समता, बंधुभाव व न्यायाच्या विचारांची पेरणी जिजाऊंच्या विचारातून, कार्यातून, कृतीतून होत गेली. ते जिजाऊंचे भक्त झाले, अनुयायी झाले. अकराव्या वर्षीच शिवराय स्वराज्य स्थापनेसाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक दृष्ट्या पूर्णपणे प्रशिक्षित झालेले होते. शिवरायांच्या संपूर्ण कार्य कर्तुत्वावर जिजाऊंच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. उभ्या हयातीत त्यांनी कोणत्याही स्त्रीचा कधीही अवमान केल्याची नोंद इतिहासात नाही. महिलांना त्यांनी स्वातंत्र्य, अधिकार, मान - सन्मान मिळवून दिले. त्या काळात जे जे उत्तम मानवी कल्याणाचे विकासाचे होते तेथे जिजाऊ शिवराय यांना सांगत आणि शिकवत असत.
जिजाऊंचा इतिहास आज सर्वांनीच वाचणे, समजून घेणे गरजेचे आहे. कारण त्यांचे विचार कालातीत आहेत. या इतिहासातून पाठ व प्रेरणा घेतली आणि कालसुसंगत विचार स्वीकारले, आपल्या मुलांना त्या पद्धतीने घडवले तर निश्चित शिवराय घडतील. आज जे जे उत्तम आहे, मानव कल्याणाचे आहे, आधुनिक आहे, जागतिक आहे तेआजच्या महिलांनी समजून घेतले व तसेच संस्कार मुलांच्यावर केले तर निश्चित आधुनिक शिवराय घडतील. शिवराज्य प्रस्थापित होईल. आज शिवराज्याची आम्हाला खूप खूप गरज आहे. आज जिजाऊंच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने जिजाऊंना अभिवादन करीत असतानाच आपण अंधश्रद्धा कालबाह्य रुढी-परंपरा तून मुक्त होण्याचा जरी निश्चय केला तरी शिवराज्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने उचललेले आपले ते महत्त्वाचे पाऊल ठरेल. धन्यवाद.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
------ डॉ.निर्मला पाटील. (9822725678) सांगली.(17/06/2021)
No comments:
Post a Comment