Sunday, 27 June 2021

राजर्षी शाहू महाराज यांचे होमिओपॅथी क्षेत्रातील कार्य

जगातील नवनवीन शास्त्रांचा व तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्याचा उपयोग आपल्या प्रजेच्या सुखासाठी, समृद्धीसाठी करणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

राज्यकारभार करीत असताना छत्रपती शिवरायांचे सुराज्याचे स्वप्न शाहू महाराजांच्या दृष्टीसमोर होते. शिवरायांचा प्रत्येक विचार कृतीत आणण्याचे प्रयत्न त्यांनी अविरतपणे केलेले दिसून येतात.शिवरायांच्या इतिहासातून, कार्य-कर्तृत्वातून पाठ व प्रेरणा घेत असतानाच जगभरातील नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञान ही ते समजून घेत होते व याचा प्रयोग ते विविध क्षेत्रात करीत होते. 

   आज मानवाला आजारातून मुक्त करण्यासाठीच्या अनेक औषधोपचार पद्धती जगभर पाहायला मिळतात. यातीलच एक होमिओपॅथिक उपचार पद्धती. या उपचार पद्धतीचा शोध इ. स. 1790 मध्ये ऍलोपॅथीचे उच्च शिक्षण घेतलेल्या जर्मन देशातील डॉ. सॅम्युअल हानिमान  यांनी लावला. ॲलोपॅथी मध्ये मानवी शरीराचा प्रामुख्याने विचार करून उपचार केला जातो पण होमिओपॅथीमध्ये मानवी मनाचा प्राधान्याने विचार करून उपचार केला जातो. युरोप व अमेरिकेमध्ये या उपचार पद्धतीचा प्रचार प्रसार झपाट्याने झाला. या उपचार पद्धतीला जगभर मान्यता मिळाली ती एकोणिसाव्या शतकात. आज या  उपचार पद्धतीला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. 

    आज भारतभर होमिओपॅथीचे अनेक दवाखाने,  हॉस्पिटल,  महाविद्यालय पाहायला मिळतात. पण साधारण 80 - 90 वर्षापूर्वी भारतामध्ये या उपचार पद्धतीची माहिती मोजक्याच व्यक्तींना होती. 

    पंजाब मध्ये जन्म झालेले थोर ऐतिहासिक व्यक्तिमत्व रणजीत सिंह (सन 1780 -1839 )यांनी होमिओपॅथिक उपचार पद्धती प्रथम भारतात आणली. त्यांनी जर्मनीमधील थोर होमिओपॅथिक तज्ञ डॉ. होनिंगबर्ग यांना पाचारण करून आपल्या दरबारात राजाश्रय  दिला होता. स्वतः रणजीतसिंह  व त्यांचे सर्व कुटुंबीय होमिओपॅथिक औषध उपचार घेत होते. बंगालमध्ये कॉलराची साथ आली तेव्हा अनेक कॉलरा ग्रस्त रुग्णावर डॉ. होनिंगबर्ग यांनी यशस्वीपणे औषध उपचार केले होते. अनेकांना जीवदान दिले होते. 

  होमिओपॅथीचा भारतातील पहिला सार्वजनिक दवाखाना स्थापन करण्याचे श्रेय मात्र महाराष्ट्रातील एका थोर राजाला जाते ते म्हणजे करवीर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज. 

      करवीर संस्थांमधील डॉक्टर धोंडोपंत बोरकर यांना होमिओपॅथीचे ज्ञान होते आणि ते शाहू महाराजांचे वैयक्तिक डॉक्टर होते. जेव्हा देशभर धुमाकूळ घातलेल्या प्लेगच्या साथीने 1898 मध्ये करवीर संस्थानात प्रवेश केला तेव्हा दोन वर्षे शाहू महाराजांनी या साथीला आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न केले होते. त्यावेळी प्लेगसाठी ऍलोपॅथिक उपचार पद्धतीमध्ये कोणतेही औषध नव्हते मात्र होमिओपॅथीमध्ये काही गुणकारी औषधे आहेत याची माहिती महाराजांना झाल्यावर डॉ. बोरकर यांच्या मदतीने कोल्हापूर मध्ये त्यांनी होमिओपॅथीचा दवाखाना सुरू केला. हाच भारतातील पहिला होमिओपॅथीचा सार्वजनिक दवाखाना ठरला.( सन 1898) शाहू महाराजांच्या पणजी महाराणी अहिल्याबाई यांच्या नावाने हा दवाखाना सुरू केला गेला. 75 वर्षांपूर्वी हा दवाखाना भाऊसिंगजी रोड वरील पूर्वीच्या कोतवालाची चावडी असलेल्या जागेत स्थलांतरित केलेला आहे व सध्या "श्रीमंत शाहू छत्रपती होमिओपॅथिक दवाखाना" असे नामांतर केले आहे. 

   इसवी सन 1902 मध्ये शाहू महाराज इंग्लंडला गेले असताना त्यांनी "लंडन होमिओपॅथिक हॉस्पिटल "ला भेट दिली होती. शाहू महाराजांना होमिओपॅथीचे महत्त्व पटले होते. 

    इ. स.1986 मध्ये कोल्हापूर मधील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची तपासणी करण्याकरिता सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, दिल्लीचे एक तज्ञांचे मंडळ आले होते. या मंडळातील एक तज्ञ डॉ. सिन्हा यांनी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या दवाखान्यात भेट दिली. तेथील दुर्मिळ ग्रंथ, ऐतिहासिक वारसा पाहून ते भारावून गेले. त्यावेळी त्यांनी काढलेले उदगार "होमिओपॅथीच्या क्षेत्रात कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचे कार्य अग्रेसर असून त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायला हवे!"

   होमिओपॅथिक उपचार पद्धती ही अत्यंत सहज आणि कोणत्याही दुष्परिणामा  शिवाय कार्य करते.  शेवटी प्रत्येक उपचार पद्धतीचे काही फायदे,  तोटे आणि मर्यादा आहेत. होमिओपॅथीचे महत्त्व लक्षात घेऊन शाहू महाराजांनी या उपचार पद्धतीला राजाश्रय दिला होता. पण वर्तमान काळात या उपचारपद्धतीची म्हणावी तशी दखल समाजाकडून आणि शासन दरबारी घेतली गेलेली नाही ही एक शोकांतिका आहे. होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा प्रचार, प्रसार आणि स्वीकार व्हावा ही राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अपेक्षा. धन्यवाद. जय जिजाऊ. 

     --डॉ. निर्मला पाटील. सांगली

   राष्ट्रीय अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड. तथा प्रदेशाध्यक्ष, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,  महाराष्ट्र. (9822725678)

26/06/2021 ( *राजर्षी*  *शाहू* *महाराज* *जयंती* *दिन* )

No comments:

Post a Comment