Tuesday, 3 August 2021

क्रांतिसिंह नाना पाटील


🚩 *क्रांतिसिंह* *_नाना_* *_पाटील_*: *_एक_* *_क्रांतीपर्व_* 🚩🚩

        परिवर्तनाची प्रक्रिया हजारो वर्षापासून सुरूच आहे. अनेक महामानवांनी या प्रक्रियेतील प्रवाहाला, प्रवासाला गती देण्याचे महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. हा इतिहास आजही आम्हाला प्रेरणा देणारा, अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यास बळ देणारा आहे. 

    या प्रवाहातील असे अनेक महानायक आहेत की त्यांचा इतिहास सोनेरी पानावर लिहिला जाणे आवश्यक होते,  पण त्यांच्या कार्याची, संघर्षाची,  त्यागाची साधी दखल सुद्धा साहित्यिकांनी, इतिहासकारांनी घेतलेली नाही. या इतिहासामुळे अनेक सामाजिक सुधारणा घडून आल्या असत्या. नवीन पिढी सुसंस्कारित झाली असती. असा देदीप्यमान इतिहास मातीत घातला आणि शून्य कार्यकर्तृत्व असणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना महानायक म्हणून पुढे आणले आणि समाजाला गुलाम,  दिशाहीन करण्याचा प्रचंड मोठा हा अक्षम्य अपराध बऱ्याच साहित्यिकांनी आणि इतिहासकारांनी केलेला आहे. 

      3 ऑगस्ट 1900 या दिवशी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका महानायकाचा जन्म झाला,  त्यांचे नाव नाना पाटील. क्रांतिसिंहाचा कार्यकाळ अगदी विस्मृतीत जाण्याइतकाही दूरचा नाही तरीही त्यांनी केलेल्या कामाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही.  प्रत्येक व्यक्तीच्या जीभेवर नानांचा प्रेरणादायी इतिहास असायला हवा होता पण अपवाद वगळता नानांच्या इतिहासाचे फारसे स्मरण कोणाला नाही. 

    नानांचे विचार आणि त्यांनी केलेले काम आजच्याही काळात समजून घेऊन कृती करण्यासारखे आहे त्यांच्या आयुष्यातील काही घटना समजून घेणे आवश्यक आहे जेणेकरून आजच्या काही सामाजिक समस्या सुटू शकतील. 

    सांगली जिल्ह्यातील येडेमच्छिंद्र हे नानांचे गाव. इतर गावाप्रमाणेच हे सुद्धा अठरापगड जाती धर्माच्या समूहांनी बनलेले. शिक्षणापासून थोडे दूरच असल्यामुळे अज्ञान, गरिबी,  अंधश्रद्धा,  कालबाह्य रूढी परंपरा या माध्यमातून सर्वच बाजूंनी शोषण होत असलेले. यातून निर्माण झालेल्या समस्यांना तोंड देत गावकरी जीवन जगत होते. नानांकडे सुपीक जमीन असल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बरी होती.            शेतीची कामे करीत करीत नानांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतले. कुस्तीची सुद्धा आवड त्यांच्यात या वयात निर्माण झाली होती. शिक्षणाच्या जोरावर त्यांना तलाठ्याची नोकरी मिळाली. सत्यशोधकी जलसे आणि छत्रपती मेळाव्यांना नाना जावू लागले. यातून होणाऱ्या प्रबोधनामुळे नाना प्रभावित होऊ लागले आणि एक दिवस त्यांनी आपल्या नोकरीचा,  सर्व सुखांचा त्याग केला आणि ते स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरले. 

     त्यांच्यावर शिवचरित्राचा व महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा प्रचंड मोठा प्रभाव होता. त्यांचा त्यांनी अभ्यास,  मनन, चिंतन करून ते विचार कृतीत आणल्याचे दिसून येते. अज्ञान,  गरिबी, अंधश्रद्धा,  चुकीच्या रूढी-परंपरा,  गुलामगिरी, शोषण, वर्णद्वेष या बाबींच्या विरोधात त्यांचा लढा कायम राहिलेला आहे. नाना नेहमी सांगायचे की,  विवाहासारख्या  समारंभासाठी कर्ज काढू नका. हुंडा देऊ नका,  घेऊ नका,  खोट्या प्रतिष्ठा मान पान यासाठी पैसा खर्च करू नका,  तर मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करा. प्रसंगी कर्ज काढा पण मुलांना शिक्षण द्या. सत्यशोधकी पद्धतीचे अनेक विवाह नानांच्या प्रयत्नामुळे घडून आले. त्यांनी स्वतःचा विवाह सत्यशोधक पद्धतीने केला. पण स्वतःच्या विवाहात त्यांनी स्वतः मंगलाष्टके म्हटली व कोणत्याही भटजी शिवाय हा विवाह पार पडला. ही एक अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक घटना होती पण या घटनेची दखल इतिहासात फारशी घेतली गेली नाही. 

     महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा खरा वारसदार शिक्षणाचे महत्त्व अचूक ओळखू शकतो. नानांच्या पत्नी आकुबाई या दुधोंडी जिल्हा सांगली गावातील, नलवडे घराण्यातील होत्या. त्यांना लिहिता-वाचता येत नव्हते. नानांनी त्यांना साक्षर करण्याचे ठरवले पण घरची मंडळी त्याला विरोध करू लागली. या वेळी नानांनी आपला निर्णय जाहीर करून टाकला,  जोपर्यंत आकुबाईना लिहिता वाचता येणार नाही तोपर्यंत मी त्यांचा पत्नी म्हणून स्वीकार करणार नाही आणि त्यांचा शब्द ही त्यांनी पाळला. त्यांना लिहायला वाचायला आल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नी म्हणून स्वीकार केला. आज परिस्थिती बदललेली आहे. अपवाद वगळता सर्वच महिला शिक्षित आहेत पण अपवादानेच सुशिक्षित आहेत,  विज्ञान निष्ठ आहेत. अशा कुटुंबातील महिला सुशिक्षित,  विज्ञाननिष्ठ झाल्या पाहिजेत यासाठी त्या कुटुंबातील इतर सदस्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तरच प्रत्येक कुटुंब सुखी समृद्धी आणि भयमुक्त होईल. 

     1940 च्या दरम्यान स्वातंत्र्यलढ्याची चळवळ बाळसे धरू लागली. आणि एक दिवस नानांनी आपले घर, गाव सोडले ते कायमचे. सातारा मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात भाषण करून वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली. या कारणाने त्यांना अटक झाली. एक वर्ष तीन महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली. खरंतर नानांचे घराणे वारकरी संप्रदायाचे होते. नानांच्या वयाच्या बाराव्या दिवशी त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली गेली,  ते वारकरी झाले. पण हा वारकरी पंढरपूरला कमी आणि स्वातंत्र्यासाठी तुरुंगात जास्त वेळा वाऱ्या करणारा ठरला. 1932 ते 1942 या काळात नानांच्या तुरुंगात आठ वेळा वाऱ्या झाल्या. 

   स्वातंत्र्य चळवळीत काम करीत असताना नानांच्या पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याची  संकल्पना होती आणि यातूनच त्यांना प्रतिसरकारची संकल्पना सुचली. इंग्रजांनी संपूर्ण भारतभर राज्य प्रस्थापित केले पण प्रतिसरकार मुळे साताऱ्यात त्यांना आपले राज्य प्रस्थापित करता आले नाही. इंग्रज अधिकाऱ्यांना,  पोलिसांना त्यांनी सळो की पळो करून सोडले होते. नानांचा त्यांनी धसकाच घेतला होता. प्रतिसरकारच्या माध्यमातून शिवराज्य उभं करण्याचा नानांचा प्रयत्न होता. दुर्लक्षित उपेक्षित लोकांना न्याय मिळवून देणे,  भूमिहीनांना जमीन देणे,  सावकारकी नष्ट करणे,  स्त्रियांना हक्क अधिकार मिळवून देणे अशी अनेक कामे प्रतीसरकारने केलेली आहेत. यामुळेच नाना लोकांचा प्रचंड विश्वास आणि पाठिंबा मिळवू शकले. 

     त्यांचे संघटन कौशल्य जबरदस्त होते. आवाज भारदस्त होता आणि संभाषण कौशल्य ही खूप छान होते.  त्यांनी वेळोवेळी शिवतंत्राचा वापर ब्रिटिश सत्ता खिळखिळी करण्यासाठी व स्वराज्य उभे करण्यासाठी केलेला दिसून येतो. नाना नेहमी म्हणत की नाना नेहमी म्हणत की साताऱ्यातील प्रतिसरकार उभे करण्यापाठीमागे आम्हाला शिवचरित्रातून प्रेरणा मिळालेल्या आहेत.  26 मे 1946 ला मुंबई येथे नाना पाटील यांच्या कार्याची दखल घेत प्रचंड जनसमुदायाने त्यांना *क्रांतिसिंह* या उपाधीने सन्मानित केले. 

      नाना अहिंसावाद मानणारे होते. पण त्याबरोबरच त्यांनी दरोडेखोरांचा निप्पात करण्याचा मोहिमेतही सक्रिय सहभाग घेतला होता. प्रसंगी नाठाळाचे माथी काठी मारण्याचे ही काम त्यांनी केलेले आहे. तुफान सेनेचा जन्मही काट्याने काटा काढण्याच्या उद्देशाने झाला. ब्रिटिशांची दडपशाही व स्थानिक गुंडांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी त्यांनी प्रसंगानुरूप अनेक तंत्रांचा वापर केला व दरोडेखोरांचा निप्पाद  करण्यासाठी तुफान सेना कार्य करू लागली.  नानांनी त्याची सूत्रे कुंडल गावचे सुपुत्र आदरणीय जी. डी. बापू लाड यांच्याकडे सोपविली. ही एक प्रशिक्षित कार्यकर्त्यांची सेना होती. गावागावातून तरुण कार्यकर्ते शोधून त्यांना प्रशिक्षित करून तुफान सेनेला पुरवण्याचे कार्य सेवादल  करीत होते. त्याचे केंद्र कुंडल ला होते. अनेक कार्यकर्त्यातून या प्रशिक्षणासाठी काही कार्यकर्त्यांची निवड केली जात असे. त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना गावच्या रक्षणाची जबाबदारी दिली जात असे. गावच्या संरक्षणाबरोबरच रचनात्मक कार्य ही प्रशिक्षणार्थी करत असत. दारूबंदी,  हुंडाबंदी,  स्वच्छता साक्षरता प्रसार,  कर्ज निवारण, क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे, रक्षण करणे,  त्यांच्या अडचणी सोडवणे अशा प्रकारची कार्यही ते करीत असत.आजची सामाजिक स्थिती पाहता अशा  प्रशिक्षित कार्यकर्त्यांची गरज प्रत्येक गावाला आहे असे वाटते. समाजासमोर आज अनेक समस्या, आव्हाने आहेत जर प्रत्येक गावात प्रशिक्षित कार्यकर्ते असतील तर निश्चित ही एक दिलासा देणारी बाब ठरेल. गावकऱ्यांच्या अडचणी सोडवून जागतिकीकरणाच्या प्रवाहात आणण्याचे काम निश्चित असे प्रशिक्षित कार्यकर्ते करू शकतील. 

     नानांचा स्वभाव जितका हळवा होता तितकाच अन्यायाविरोधात कठोर होत होता. सर्वसामान्य जनतेचे होणारे हाल, शोषण,  त्यांची गरिबी अज्ञान पाहून त्यांना त्याचा कळवळा येत असे आणि ते अन्यायाविरोधात पेटून उठत.    स्वातंत्र्यप्राप्तीच्या प्रवासाच्या दरम्यान नानांच्या पत्नी आकुबाई यांचे निधन झाले. एका वर्षात वडिलांचे निधन झाले. पुढे तीन महिन्यात धाकट्या भावजयीचे निधन झाले. असे अनेक आघात झाले तरी नानांनी आपला प्रवास थांबविला नाही किंवा त्याची दिशाही बदलली नाही. 

       समाजाचा विकास सामाजिक सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने नानांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजकारणात प्रवेश केला. गरीब,  वंचित,  उपेक्षित, कष्टकरी,  शेतकरी यांचे राज्य आणण्यासाठी,  त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी,  त्यांच्या कल्याणासाठी राजकीय क्षेत्रात ते उतरले. पण हा सर्व त्यांचा भाबडा आशावाद ठरला. खरंच आम्ही स्वतंत्र झालो आहोत का?  हा त्यावेळी नानांना पडलेला प्रश्न आजही आमच्या पुढे आहेत. राज्यकर्ते फक्त बदलले पण परिस्थिती बदलली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही नानांचे अंतकरण दुःखी होते. आजही सामाजिक स्थिती फारशी बदललेली नाही. काही नवीन प्रश्न,  आव्हाने आमच्यापुढे नव्याने निर्माण झालेली आहेत. आम्ही यामध्ये बदल, परिवर्तन घडवून आणू शकतो. फक्त त्यासाठी गरज आहे ती महामानवांच्या विचारावर आचरण करणाऱ्या त्यांच्या अनुयायांची. त्यांच्या इतिहासाचा कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करून चिंतन करून कालसुसंगत आचरण करणाऱ्या कृतिशील वारसदारांची. 

     तीन ऑगस्ट क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जयंतीदिन तर 6 डिसेंबर 1976 त्यांचा मृत्यू दिन. *क्रांतिसिंह* *नाना* *पाटील* नावाचे परिवर्तनाच्या प्रक्रियेतील खूप मोठे वादळ आजही ते विचारांच्या रूपाने आमच्या सभोवती फिरत आहे. गरज आहे फक्त ते वादळ डोक्यात,  मेंदूत आणि मनात पेलण्याचे . नानांच्या जयंतीदिनी त्यांचे काही विचार तरी कृतीत आणण्याचा आपण संकल्प करू या. 

जय जिजाऊ जय शिवराय. 

    -- ✒️डॉ. निर्मला पाटील. (प्रदेशाध्यक्ष, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद महाराष्ट्र.)

(03/07/2021)     सांगली.

Sunday, 27 June 2021

लोकमाता अहिल्यामाता होळकर



     जगातील एक उत्तम शासन कर्ती  म्हणून नावलौकिक मिळविलेल्या अहिल्यामाता होळकर यांची 31 मे रोजी जयंती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही जयंती कौटुंबिक स्तरावर किंवा ऑनलाइन पद्धतीने साजरी केली जात आहे. गेल्या दीड वर्षापासून जगभर कोरोनाने सर्वच स्तरावर अस्थिरता निर्माण केलेली आहे. आज माणसापुढे अनेक संकटे,  आव्हाने उभी आहेत. महामानवांची जयंती साजरी करत असताना आपण त्यांचा इतिहास, कार्यकर्तृत्व त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यांनी दिलेला लढा यांना जर उजाळा देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या इतिहासातून पाठ व प्रेरणा घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आपला भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठीच्या प्रेरणा नक्कीच मिळतील,  संकटांना,  आव्हानांना पेलण्याचे बळ नक्की  मिळेल. 

         अहिल्यमातानी आपल्या आयुष्यात आलेल्या अनेक संकटावर मात केली  ती त्यांच्यातील असलेल्या गुणांच्या जोरावर. त्या विज्ञाननिष्ठ, धाडशी,  पुरोगामी विचारसरणीच्या,  चिकित्सक,  प्रयत्नवादी होत्या. उत्तम प्रशासक असणाऱ्या अहिल्यामातांनी लोककल्याणकारी राज्य केले. आपला राजदंड आयुष्यभर शोषणाच्या विरोधात आणि शोषितांच्या बाजूने वापरलेला आहे.

      त्यांचा जन्म 31मे 1725 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील,  जामखेड तालुक्यातील, सीना नदीच्या काठावरील चौंडी या गावी झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव सुशिलाबाई तर पिताश्रींचे नाव माणकोजी शिंदे. चौंडी गावच्या पाटीलकीचा  मान माणकोजी यांच्याकडे होता. ते गावचा कारभार अत्यंत उत्तम पणे सांभाळत होते. युद्ध कलेत पारंगत असलेले माणकोजी यांना शेतीची ही  उत्तम जाण होती. त्यांची सहा अपत्ये,  पैकी पाच मुले व एक मुलगी अहिल्या.

    त्यांनी मुलगा -मुलगी हा भेदभाव न करता मुलांच्या बरोबरीने  मुलगीला ही शिक्षण दिले होते. तिला लिहिता-वाचता येत होते. शिवाय युद्धशास्त्रात ही पारंगत केले होते. त्यामुळे अहिल्यामातामध्ये प्रचंड धाडस व आत्मविश्वास निर्माण झाला होता.

       20मे 1733 मध्ये त्यांचा विवाह मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी पुणे येथे झाला. विवाहानंतर त्या इंदौरला आल्या. त्यांच्या सासुबाई गौतमा बाई अत्यंत हुशार,  धाडशी,  धैर्यवान व युद्धशास्त्र पारंगत होत्या. इंदौरचा राज्यकारभार त्या पहात होत्या. नऊ वर्षांच्या अहिल्यामाता राज्यकारभार सांभाळण्यात गौतमाबाईंना मदत करू लागल्या.

     मल्हारराव होळकर त्यांना राज्यकारभाराचे धडे देत असत. सासरे व पती यांच्याबरोबर त्या अनेक वेळा युद्धावर गेलेल्या आहेत. सासू, सासरे व पती यांनी अहिल्यामाता ना परिपूर्ण शिक्षण दिले होते. इतिहास, वेद, पुराण यांचे वाचन, सत्य शोधण्याचा प्रयत्न,  यावर त्यांनी चिंतन मनन करून सत्य स्वीकारले होते.

    सासू, सासरे,  पती, मुलगा,  नातू अशा जवळच्या नातेवाइकांच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला सावरत त्यांनी आपल्या प्रजेला संतती मानत आयुष्यभर त्यांच्या सुखासाठी, आनंदासाठी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्या काळी त्या जगातील सर्वश्रेष्ठ महाराणी  ठरलेल्या आहेत.

     मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्याकडे स्वतःच्या खाजगी मालकीची मोठी संपत्ती  होती . तो सर्व पैसा त्यांनी जनतेच्या सुख सोयीसाठी,  लोककल्याणासाठी वापरला. अहिल्यामातांनी स्वतः योजना आखल्या,  आराखडा तयार केला. रस्ते,  धर्मशाळा बांधल्या,  पिण्याच्या पाण्याची सोय केली. घाट बांधले, अन्नछत्रे उघडली वृक्षारोपण केले. भारतात जवळजवळ साडेतीन हजार ठिकाणी त्यांनी ही कामे केलेली आहेत. महेश्वरी येथे कपड्यांचा उद्योग उभा केला. कारागिरांना,  कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला.

    स्त्रिया व शेतकरी यांच्या हक्क अधिकारासाठी त्यांनी अनेक धोरणे राबवली होती.

     त्यांच्या राज्यात ताबडतोब व वेळेत न्याय देण्याची व्यवस्था असल्यामुळे,  तुरुंग निर्माण करण्याची गरजच नव्हती. लोकमाता जगातील एक आदर्श राज्यकर्ती  स्त्री ठरल्या. त्यांच्या कार्याला व कर्तुत्वाला त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    --- डॉ. निर्मला पाटील. सांगली.(9822725678).

     31/05/2021.

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब


 


🚩🚩 *स्वराज्य* *प्रेरिका* - *राष्ट्रमाता* *राजमाता* *जिजाऊ* *साहेब* 🚩🚩

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथे 12 जानेवारी 1598 ला झाला व 17 जून 16 74 ला त्यांचे निधन रायगडच्या पायथ्याशी पाचाड येथे झाले. एक धगधगती ज्योत शांत झाली. जिजाऊच नसत्या तर छत्रपती शिवराय घडले नसते आणि महाराष्ट्राचा, देशाचा इतिहास काही वेगळाच असता. रयतेवर होणारे अन्याय,  अत्याचार, शोषण,  गुलामी याची चीड आणि आपलीच माणसं वेगवेगळ्या परकीय राजांच्यासाठी लढताना मारली गेल्याच दुःख यातूनच शहाजीराजांच्या मनात स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे विचार येऊ लागले आणि त्यांनी तसे प्रयत्नही केले पण या प्रयत्नांना त्यांना यश आले नाही. हेच बीज त्यांनी जिजाऊंच्या मनात पेरले ते   रुजले, अंकुरले,  बहरले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने. 

     स्वराज्यस्थापनेचे आपल्या पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले उभे आयुष्य खर्ची घातले. अनेक तडजोडी, त्याग,  संकटे, संघर्ष यांनी त्यांचे आयुष्य व्यापलेले आहे. स्वराज्याच्या निर्मितीसाठी जणूकाही त्यांचा जन्म झालेला होता. शिवराज्याभिषेकानंतर अवघ्या बाराव्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. 

 अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिजाऊंनी इतके अचाट धाडस प्रयत्न केले ते केवळ त्यांच्यावर झालेल्या संस्काराच्या व मिळालेल्या शिक्षणाच्या जोरावर. मनुस्मृतीने लादलेली शिक्षणबंदी झुगारून त्यांच्या मातोश्री म्हाळसाबाई राणीसाहेब व पिता लखुजीराजे यांनी त्यांना उच्च शिक्षण दिले. वयाच्या दहाव्या वर्षी त्या चार शास्त्रात (भाषाशास्त्र, युद्धशास्त्र,  समाजशास्त्र,  अर्थशास्त्र )व सहा भाषा (मराठी,  हिंदी, कन्नड,  अरबी, फारसी, उर्दू )मध्ये पारंगत झाल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट  म्हणजे म्हाळसारानींनी  त्यांना त्यांच्या पूर्वजांचा जाज्वल्य इतिहास वारंवार सांगितलेला होता. या सर्व शिक्षणामुळे त्या धाडसी,  चिकित्सक, विज्ञाननिष्ठ,  अंधश्रद्धेतून -कालबाह्य रूढी-परंपरा तून मुक्त झाल्या होत्या. आणि याच शिक्षणाचा उपयोग त्यांना शिवरायांना घडविताना झाला. 

    मनुस्मृतीचे अनेक कायदे त्यांनी झुगारले. धार्मिक दहशतवादाला लाथ मारून शेतकऱ्यांच्या,  कष्टकऱ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. त्यांना माणूस म्हणून जगायला शिकविले. जमिनी,  बी-बियाणे,  बैलजोड्या,  शेती अवजारे दिली. आंबावडी,  पुनवडी सारखी धरणे पुणे येथे बांधली. भूविकास बँकेची संकल्पना ही जिजाऊंची होती. 

    परकीय राजांची  आक्रमणे सातत्याने होत असत. रयत त्रासून   गेलेली होती .या त्रासातून मुक्त होण्यासाठी शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुलांच्या हातात तलवारी दिल्या आणि त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी प्रेरित केले,  प्रशिक्षित केले. 

    शिवबाना स्वराज्य संस्थापक म्हणून घडविण्याची मोठी जबाबदारी जिजाऊनी पार पाडली. शहाजीराजे बराच काळ इतर शाह्यांच्या  कामगिरीवर असत पण त्यांचे संपूर्ण  सहकार्य, मार्गदर्शन,  सल्ले जिजाऊंना योग्य वेळी मिळत असे. जिजाऊंना जे संस्कार,  शिक्षण, अनुभव मिळाले आणि दोन्ही कुळांचा ज्वलंत इतिहासाचा वारसा मिळाला याच्या जोरावर त्या शिवरायांची जडणघडण करू लागल्या. जिजाऊंना मुलांच्या मानसशास्त्राची चांगली जाण होती. त्यांनी नेहमी स्वराज्य स्थापना व स्वराज्य संस्थापक या ध्येयावर शिवाजीराजांचे लक्ष केंद्रित केले. त्यांना प्रेरित केले,  प्रशिक्षित केले. शिवरायांच्या मनात स्वातंत्र्य, समता,  बंधुभाव व न्यायाच्या विचारांची पेरणी जिजाऊंच्या विचारातून, कार्यातून,  कृतीतून होत गेली. ते जिजाऊंचे भक्त झाले, अनुयायी झाले. अकराव्या वर्षीच शिवराय स्वराज्य स्थापनेसाठी शारीरिक,  मानसिक, बौद्धिक दृष्ट्या पूर्णपणे प्रशिक्षित झालेले होते. शिवरायांच्या संपूर्ण कार्य कर्तुत्वावर जिजाऊंच्या विचारांचा प्रभाव जाणवतो. उभ्या हयातीत त्यांनी कोणत्याही स्त्रीचा कधीही अवमान केल्याची नोंद इतिहासात नाही. महिलांना त्यांनी स्वातंत्र्य,  अधिकार, मान - सन्मान मिळवून दिले. त्या काळात जे जे उत्तम मानवी कल्याणाचे विकासाचे होते तेथे जिजाऊ शिवराय यांना सांगत आणि शिकवत असत. 

     जिजाऊंचा इतिहास आज सर्वांनीच  वाचणे, समजून घेणे गरजेचे आहे. कारण  त्यांचे विचार कालातीत आहेत. या इतिहासातून पाठ व  प्रेरणा घेतली आणि कालसुसंगत विचार स्वीकारले, आपल्या मुलांना त्या पद्धतीने घडवले तर निश्चित शिवराय घडतील. आज जे जे उत्तम आहे,  मानव कल्याणाचे आहे,  आधुनिक आहे, जागतिक आहे तेआजच्या महिलांनी समजून घेतले व तसेच संस्कार मुलांच्यावर केले तर निश्चित आधुनिक शिवराय घडतील. शिवराज्य प्रस्थापित होईल. आज शिवराज्याची आम्हाला खूप खूप गरज आहे. आज जिजाऊंच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने जिजाऊंना अभिवादन करीत असतानाच आपण अंधश्रद्धा कालबाह्य रुढी-परंपरा तून मुक्त होण्याचा जरी निश्‍चय केला तरी शिवराज्य प्रस्थापित करण्याच्या दिशेने उचललेले आपले ते महत्त्वाचे पाऊल ठरेल. धन्यवाद. 

     🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    ------ डॉ.निर्मला पाटील. (9822725678) सांगली.(17/06/2021)

राजर्षी शाहू महाराज यांचे होमिओपॅथी क्षेत्रातील कार्य

जगातील नवनवीन शास्त्रांचा व तंत्रज्ञानाचा स्वीकार करून त्याचा उपयोग आपल्या प्रजेच्या सुखासाठी, समृद्धीसाठी करणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांना जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

राज्यकारभार करीत असताना छत्रपती शिवरायांचे सुराज्याचे स्वप्न शाहू महाराजांच्या दृष्टीसमोर होते. शिवरायांचा प्रत्येक विचार कृतीत आणण्याचे प्रयत्न त्यांनी अविरतपणे केलेले दिसून येतात.शिवरायांच्या इतिहासातून, कार्य-कर्तृत्वातून पाठ व प्रेरणा घेत असतानाच जगभरातील नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञान ही ते समजून घेत होते व याचा प्रयोग ते विविध क्षेत्रात करीत होते. 

   आज मानवाला आजारातून मुक्त करण्यासाठीच्या अनेक औषधोपचार पद्धती जगभर पाहायला मिळतात. यातीलच एक होमिओपॅथिक उपचार पद्धती. या उपचार पद्धतीचा शोध इ. स. 1790 मध्ये ऍलोपॅथीचे उच्च शिक्षण घेतलेल्या जर्मन देशातील डॉ. सॅम्युअल हानिमान  यांनी लावला. ॲलोपॅथी मध्ये मानवी शरीराचा प्रामुख्याने विचार करून उपचार केला जातो पण होमिओपॅथीमध्ये मानवी मनाचा प्राधान्याने विचार करून उपचार केला जातो. युरोप व अमेरिकेमध्ये या उपचार पद्धतीचा प्रचार प्रसार झपाट्याने झाला. या उपचार पद्धतीला जगभर मान्यता मिळाली ती एकोणिसाव्या शतकात. आज या  उपचार पद्धतीला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. 

    आज भारतभर होमिओपॅथीचे अनेक दवाखाने,  हॉस्पिटल,  महाविद्यालय पाहायला मिळतात. पण साधारण 80 - 90 वर्षापूर्वी भारतामध्ये या उपचार पद्धतीची माहिती मोजक्याच व्यक्तींना होती. 

    पंजाब मध्ये जन्म झालेले थोर ऐतिहासिक व्यक्तिमत्व रणजीत सिंह (सन 1780 -1839 )यांनी होमिओपॅथिक उपचार पद्धती प्रथम भारतात आणली. त्यांनी जर्मनीमधील थोर होमिओपॅथिक तज्ञ डॉ. होनिंगबर्ग यांना पाचारण करून आपल्या दरबारात राजाश्रय  दिला होता. स्वतः रणजीतसिंह  व त्यांचे सर्व कुटुंबीय होमिओपॅथिक औषध उपचार घेत होते. बंगालमध्ये कॉलराची साथ आली तेव्हा अनेक कॉलरा ग्रस्त रुग्णावर डॉ. होनिंगबर्ग यांनी यशस्वीपणे औषध उपचार केले होते. अनेकांना जीवदान दिले होते. 

  होमिओपॅथीचा भारतातील पहिला सार्वजनिक दवाखाना स्थापन करण्याचे श्रेय मात्र महाराष्ट्रातील एका थोर राजाला जाते ते म्हणजे करवीर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज. 

      करवीर संस्थांमधील डॉक्टर धोंडोपंत बोरकर यांना होमिओपॅथीचे ज्ञान होते आणि ते शाहू महाराजांचे वैयक्तिक डॉक्टर होते. जेव्हा देशभर धुमाकूळ घातलेल्या प्लेगच्या साथीने 1898 मध्ये करवीर संस्थानात प्रवेश केला तेव्हा दोन वर्षे शाहू महाराजांनी या साथीला आटोक्यात आणण्यासाठीचे प्रयत्न केले होते. त्यावेळी प्लेगसाठी ऍलोपॅथिक उपचार पद्धतीमध्ये कोणतेही औषध नव्हते मात्र होमिओपॅथीमध्ये काही गुणकारी औषधे आहेत याची माहिती महाराजांना झाल्यावर डॉ. बोरकर यांच्या मदतीने कोल्हापूर मध्ये त्यांनी होमिओपॅथीचा दवाखाना सुरू केला. हाच भारतातील पहिला होमिओपॅथीचा सार्वजनिक दवाखाना ठरला.( सन 1898) शाहू महाराजांच्या पणजी महाराणी अहिल्याबाई यांच्या नावाने हा दवाखाना सुरू केला गेला. 75 वर्षांपूर्वी हा दवाखाना भाऊसिंगजी रोड वरील पूर्वीच्या कोतवालाची चावडी असलेल्या जागेत स्थलांतरित केलेला आहे व सध्या "श्रीमंत शाहू छत्रपती होमिओपॅथिक दवाखाना" असे नामांतर केले आहे. 

   इसवी सन 1902 मध्ये शाहू महाराज इंग्लंडला गेले असताना त्यांनी "लंडन होमिओपॅथिक हॉस्पिटल "ला भेट दिली होती. शाहू महाराजांना होमिओपॅथीचे महत्त्व पटले होते. 

    इ. स.1986 मध्ये कोल्हापूर मधील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची तपासणी करण्याकरिता सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी, दिल्लीचे एक तज्ञांचे मंडळ आले होते. या मंडळातील एक तज्ञ डॉ. सिन्हा यांनी शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या दवाखान्यात भेट दिली. तेथील दुर्मिळ ग्रंथ, ऐतिहासिक वारसा पाहून ते भारावून गेले. त्यावेळी त्यांनी काढलेले उदगार "होमिओपॅथीच्या क्षेत्रात कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचे कार्य अग्रेसर असून त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायला हवे!"

   होमिओपॅथिक उपचार पद्धती ही अत्यंत सहज आणि कोणत्याही दुष्परिणामा  शिवाय कार्य करते.  शेवटी प्रत्येक उपचार पद्धतीचे काही फायदे,  तोटे आणि मर्यादा आहेत. होमिओपॅथीचे महत्त्व लक्षात घेऊन शाहू महाराजांनी या उपचार पद्धतीला राजाश्रय दिला होता. पण वर्तमान काळात या उपचारपद्धतीची म्हणावी तशी दखल समाजाकडून आणि शासन दरबारी घेतली गेलेली नाही ही एक शोकांतिका आहे. होमिओपॅथिक उपचार पद्धतीचा प्रचार, प्रसार आणि स्वीकार व्हावा ही राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने अपेक्षा. धन्यवाद. जय जिजाऊ. 

     --डॉ. निर्मला पाटील. सांगली

   राष्ट्रीय अध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड. तथा प्रदेशाध्यक्ष, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,  महाराष्ट्र. (9822725678)

26/06/2021 ( *राजर्षी*  *शाहू* *महाराज* *जयंती* *दिन* )

राजर्षी छत्रपती शाहू महाराज

 


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 

   स्त्री-पुरुष समानता हा विचार जोपर्यंत कृतीत येणार नाही,  समाज स्वीकारणार नाही, तोपर्यंत सामाजिक प्रगती, उन्नती,  विकासाची गती व सामाजिक परिस्थिती फारशी सुधारणार  नाही. समाजाचा जवळजवळ पन्नास टक्के घटक या स्त्रिया आहेत. परंतु सामाजिक, राजकीय,  शैक्षणिक, सांस्कृतिक,  धार्मिक अशा अनेक क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग 50 टक्के असलेला दिसून येत नाही. 

    आजही स्त्रीयांच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन परंपरावादी आहे. ती पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात कार्य करीत आहे. पण अजूनही पुरुषांच्या बरोबरीचे स्थान तिला मिळालेले नाही. आजही तिच्यावरील अत्याचाराच्या,  शोषणाच्या घटना वाढताना दिसून येतात. तिचे हक्क, अधिकार आणि आजचे स्त्री संरक्षणासाठीचे केलेले कायदे याची तिला माहिती करून देणे गरजेचे आहे. 

     विविध कालखंडामध्ये काही क्रांतिकारकांनी तिच्या संरक्षणाच्या हेतूने केलेले कायदे हे त्या त्या कालखंडामध्ये तिला दिलासा देणारी, आधार देणारी बाब होती. 

    राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा करवीर संस्थानामध्ये त्यांच्या कार्यकाळात स्त्री संरक्षणाच्या हेतूने केलेले कायदे धाडसाचे आणि काळाच्या पुढचेअसल्याचे दिसून येते. 

   शाहू महाराजांच्या काळात ही स्त्री वर्ग मागासलेला व उपेक्षित होता.  समाजाला चुकीच्या चालीरीती, परंपरातून मुक्त करून परिवर्तन घडवून आणायचे असेल तर महिलांना परिवर्तनाच्या प्रवाहात आणणे महत्त्वाचे होते. ती भय, भीती, दडपण, शोषण अन्याय, अत्याचार यातून मुक्त होण्यासाठी शाहू महाराजांनी त्यावेळी अनेक धाडसी निर्णय घेतले होते व या निर्णयांना त्यांनी कायद्यामध्ये रूपांतरित केले होते. 

     स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तिच्या नैसर्गिक हक्काचे संरक्षण करणारे अनेक कायदे केले आणि ते अमलात आणले. 

    *विधवा* *पुनर्विवाह* *कायदा*: जुलै 1917 मध्ये महाराजांनी त्यांच्या संस्थानांमध्ये विधवांच्या पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा संमत केला. इतर विवाहामध्ये ज्याप्रमाणे विधी केले जातात त्याप्रमाणे पुनर्विवाहात योग्य पद्धतीने ते केले जात नव्हते. या कायद्यामुळे अशा विवाहांची कायदेशीर नोंद करण्याची पद्धत सुरू झाली आणि हा एक कायदेशीर पुरावा अस्तित्वात आल्यामुळे स्त्रियांवर होणार्‍या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठीचे एक साधन उपलब्ध झाले. पडदा पद्धतीचाही महाराजांनी जाहीर निषेध केलेला होता. 

 *आंतरजातीय* *विवाह* *कायदा*: आजही आंतरजातीय विवाहामध्ये अनेक अडचणी येत आहेत. कायद्याने जरी परवानगी दिली असली तरी नातेवाईक,  कुटुंबाकडून अशा विवाहास विरोध होत असल्याचे निदर्शनास येते. पण शंभर वर्षांपूर्वी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये या संबंधातील कायदे केले होते. 12 जुलै 1919 रोजी "कोल्हापूर इलाख्यातील विवाह संबंधी कायदा "या नावाने हा कायदा प्रसिद्ध झाला होता. या कायद्यामुळे आंतरजातीय होणारे विवाह कायदेशीर ठरवले गेले पण विवाहाच्या वेळी मात्र पुरुषाचे वय 18 वर्षे पूर्ण व स्त्रीचे वय 14 वर्षे पूर्ण असले पाहिजे हे बंधनकारक होते. या काळात बालविवाह पद्धत रूढ होती. मुलींचे विवाह दहा वर्षांच्या आतच होत. पण इंग्रज सरकारने "संमती वयाचा कायदा" मंजूर केला होता. यामध्ये मुलीचे संभोग वय  किमान बारा वर्षे असावे हा दंडक होता. या काळात शाहू महाराजांनी मुलींचे विवाहाचे वय 14 वर्षे पूर्ण असावे हा केलेला कायदा त्याकाळात धाडसाचा व पुरोगामी म्हणावा लागेल. 

     ज्या स्त्रीचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले आहे तिला तिचा जोडीदार स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य देणारे एक कलम ही केले होते. आणि या विवाहाची रीतसर नोंदणी होणार होती. हा कायदा म्हणजे स्त्री-पुरुष सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार  करणारे महाराजांनी उचललेले क्रांतिकारक  पाऊल होते. 

 *क्रूरपणाच्या* *वर्तनास* *प्रतिबंध* *करणारा* *कायदा*: स्त्रियांचा नवरा व त्यांच्या नातलगांकडून अतोनात छळ होत असे. हे छळ अशा पद्धतीने होत कि ते अपराध्यांना 'इंडियन पिनल कोड 'मधील तरतुदीच्या मर्यादेत आणता येत नसे.हा कायदा करण्यापूर्वी महाराजांनी या छळांचा बारकाईने अभ्यास केला होता व छळाचा कोणताही प्रकार न्यायदेवतेच्या नजरेतून सुटणार नाही अशा पद्धतीने सर्वसमावेशक कायदा त्यांनी केला. 2 ऑगस्ट 1919 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये "स्त्रियांना क्रूरपणाने वागविण्याचे नाहीसे करावे किंवा त्यास प्रतिबंध करावा म्हणून केलेले कायदे "आणि "कोल्हापूरचे काडी मोडण्याचे ( घटस्फोट )नियम "हे स्त्रियांच्या संरक्षणासाठीचे दोन कायदे जारी केले. एकूण अकरा कलमांच्या या कायद्यानुसार स्त्रीला क्रूरपणाची वागणूक देणाऱ्या अपराध्यास सहा महिन्यांचा कारावास व दोनशे रुपये पर्यंत दंड अशी शिक्षा करण्याची तरतूद केली होती. 

 *घटस्फोटाचा* *व* *वारसाचा* *कायदा*: घटस्फोटासंबंधीच्या  कायद्यामध्ये स्त्री हक्काचे संरक्षण व घटस्फोटानंतर अन्न वस्त्र खर्चाची योग्य व्यवस्था,  तिला वैवाहिक संतती असेल तर त्यांच्या  ताब्याबद्दलची, पोटगीबद्दलची व शिक्षणाबद्दलची व्यवस्था केली गेली. या कायद्यामध्ये जातपंचायतीच्या लहरीवर आधारलेल्या,  प्रसंगी स्त्रीवर अन्याय करणारा घटस्फोट अमान्य करण्यात आला. कायद्याच्या भक्कम पायावर तिचे नैसर्गिक हक्क, अधिकार  आधारले  गेले. 

    17 जानेवारी 1920 रोजी करवीर सरकारच्या गॅझेटमध्ये "हिंदू वारशाच्या कायद्याच्या दुरुस्तीचा कायदा" प्रसिद्ध झाला. या कायद्यानुसार शुद्राची अनौरस संतती व ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या वरिष्ठ वर्णांची संतती यांना मिळणाऱ्या वारसा हक्कातील फरक काढून टाकला. सर्व वर्णाच्या अनौरस संततीना जनक बापाच्या मिळकतीतील वारसा हक्क दिला गेला. 

 *देवदासी* *प्रथा* *प्रतिबंध* *कायदा*: कनिष्ठ वर्गातील मुली सोडण्याची अनिष्ट प्रथा त्यावेळी अस्तित्वात होती. आजही समूळ उच्चाटन झालेले नाही. यातूनच जोगतीन,  मुरळी, देवदासी,  भाविणी इत्यादी प्रकारच्या महिलांचा  वर्ग तयार झाला. देवाला सोडल्यामुळे देवस्थानात तिला काही विशिष्ट हक्क मिळत असे पण आईबापांच्या कडून तिला काहीही मिळत नसे. महाराजांनी केलेल्या कायद्यामुळे देवस्थानकडून तिला मिळालेले हक्क व दर्जा अमान्य झाला व आईबापांच्या मिळकतीतील हक्क प्राप्त झाला. देवदासी प्रथेचे उच्चाटन करण्यासाठीचे महाराजांनी केलेले हे प्रयत्न होते. 

       इंग्रज सरकारच्या काळातही महिला विषयक असे कायदे नव्हते. कारण इंग्रज परंपरावाद्यांचा रोष ओढवून घेण्यास तयार नव्हते. त्या काळात शाहू महाराजांनी स्त्री संरक्षणासाठीचे केलेले कायदे म्हणजे त्यांनी उचललेले हे धाडसी पाऊल होते. आजही स्त्रिया विषयीचे अनेक कायदे आहेत पण त्यांचे काटेकोरपणे पालन केले,  त्याबाबत जनजागृती झाली तर आज महिलांवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण निश्चित कमी होईल. महिला सुशिक्षित, सुरक्षित आणि स्वतंत्र होतील. धन्यवाद. 

 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

 ✒️डॉ.निर्मला पाटील.(सांगली)

   (9822725678)

राष्ट्रीय अध्यक्ष,  जिजाऊ ब्रिगेड. तथा प्रदेशाध्यक्ष, जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद,  महाराष्ट्र. 

26/06/2021( *राजर्षी* *छत्रपती* *शाहू* *महाराज* *जयंती* *दिन* )